उत्तरप्रदेश: बकरी ईदच्या दिवशी राज्यात कुठेही रस्त्यावर नमाजपठण होऊ नये, तसेच राज्यात कुठेही हत्येवर बंदी असलेल्या प्राण्यांचा बळी दिला जाऊ नये, यासाठी सतर्क रहाण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व अधिकार्यांना बैठकीत दिला आहे. तसेच बंदी असलेल्या प्राण्यांचा बळी दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा आदेशही त्यांनी यावेळी दिला आहे.
लक्ष्मणपुरी येथील ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फिरंगी मैली यांनी बकरी ईदमधील बळीविषयी मुसलमानांना आवाहन केले आहे की, सामाजिक माध्यमांवर बळी दिलेल्या प्राण्याचे छायाचित्र प्रसारित करू नका. बळी दिल्यानंतर अवशेष आणि अन्य कचरा सार्वजनिक कचरा पेटीमध्ये टाका. मुसलमानांनी ईदगाहाच्या ठिकाणीच नमाजपठण करावे, तसेच ‘इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया’ने एक हेल्पलाईन क्रमांक प्रसारित केला आहे, ज्याद्वारे बकरी ईदच्या वेळी बळीच्या संदर्भात तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.