मिरा - भाईंदर: मिरा - भाईंदर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १५ एप्रिलला सायंकाळी नवघर परिसरातील मोतीलाल नगर इथल्या एका घरावर छापा टाकला. यावेळी या घरात ११ किलो ८३ ग्रॅम इतकं कोकेन जप्त करण्यात आलं. जिहादी महिला सबीना शेख असं ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलेचं नाव आहे. सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं चौकशी केली असता, हे ड्रग्ज नायजेरियन महिला आणि पुरुष पुरवत असल्याची माहिती समोर आली.
नवघर पोलीस ठाणे हद्दीतील मोतीलाल नगरातील एका महिलेच्या घरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना मिळाली होती. त्यांनी पडताळणी करून सदर महिलेच्या घरी १५ एप्रिलला सायंकाळी आपल्या टीमसह छापा टाकला. या छाप्यात ११ किलो ८३ ग्रॅम इतके कोकेन जप्त करण्यात आले आहे. तसंच ८० हजार रुपयांची रोख रक्कम देखील तिथं सापडली आहे.
पोलीस उपायुक्त गुन्हे, अविनाश अंबुरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मिरारोडमधून नायजेरियन पुरुषाला ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून कोकेन जप्त केलं. त्याची किंमत ३.९ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नायजेरियन महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वसईमधून नायजेरियन महिलेला ताब्यात घेतलं. तिची झडती घेतली असता तिच्याकडं कोकेन सापडलं. ड्रग्ज प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.