पुणे: पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी तब्बल ५० हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत इतर सगळया मंत्र्यांना बोलावणं गेलं आहे.
मात्र, या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलावणार नाही, अशी भूमिका भाजप आ. गोपीचंद पडळकरांनी घेतली आहे. हा कार्यक्रम धनगरांचा असून धनगरांनी ठरवलेला आहे. हा कार्यक्रम शासकीय नाही. त्यामुळे अजित पवारांना बोलवणार नाही, असं बोलून पडळकरांनी अजित पवारांविरोधातील हत्यार अजून म्यान केलेली नाही, असं स्पष्ट केलं आहे. आम्ही एक रचनात्मक कार्यक्रम करत आहोत. ही किरकोळ बाब आहे. तुम्ही उगाच राजकीय प्रश्न विचारु नका असं म्हणत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.