पुणे: पुण्यामधील काँग्रेसचे एक धडाडीचे नेते म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर हे वृत्त खरं होतांना दिसत आहे. रवींद्र धंगेकर हे लवकरच शिवसेना शिंदे गटाच प्रवेश करणार असून काँग्रेस सोडतांना दुःख होतं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
रवींद्र धंगेकर हे पक्षाला रामराम करून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. गेल्या वर्षी धंगेकरांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला.
पक्ष सोडण्याच्या पार्श्नभूमीवर धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली, की सगळ्या कार्यकर्त्यांशी माझी बैठक, चर्चा झाली. मी मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घेणं हे प्रचंड कठीण असतं. या पक्षासोबत मी गेली 10-12 वर्ष काम करतोय. पक्षातील सर्वांशी कौटुंबिक नाती निर्माण होत असतात. 8-10 वर्षांत आपण एकमेकांचे सहकारी होतो, कुटुंबातले होतो. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. लोकसभा असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरपर्यंत, सर्वांनीच माझ्यामागे प्रचंड ताकद उभी केली. निवडणूक यंत्रणेत सर्वांनीच भाग घेतला. मी निवडणूक हरलो, हा वेगळा विषय पण सर्वांनीच कष्ट केले, त्यांची जी ताकद माझ्या पाठिशी उभी केली’, असं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं.
‘पक्ष सोडताना खूप दुःख होतंय, मीही माणूसच आहे. मतदारांशीही मी चर्चा केली, आमच्याकडे काम कोण करणार, असा सर्वांचा सवाल होता. लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांचं काम करू शकत नाही’, असंही धंगेकर म्हणाले. मागच्या काही दिवसांत मी दोन-तीन वेळा एकनाथ शिंदे यांची कामानिमित्त भेट घेतली होती, उदय सामंत यांचीही भेट झाली. एकदा तुम्ही आमच्या सोबत काम करा, असं ते मला वारंवार सांगत होते. कामं तर करायची आहे, पण सत्तेशिवाय कामं होत नाहीत. अखेर सर्वांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला, शिंदे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं आहे. मी एकनाथ शिंदेंकडे काहीही मागितलेलं नाही. आज संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि फायनल निर्णय घेऊ असे धंगेकरांनी नमूद केलं.