अहिल्यानगर: अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे करण्याची मागणी कित्येक दिवसांपासून होत आली आहे. यादरम्यान राज्य सराकराने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याला रेल्वे मंत्र्यांनी मंजूर दिली होती. महिनाभरापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या नामांतराची घोषणा केली होती.
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. त्या इंदूरच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी जवळपास २८ वर्षे माळवा राज्याच्या महाराणी म्हणून राज्य चालवलं. या काळात त्यांनी देशभरात धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, बारवं, अनेक अन्नछत्रे उघडली. त्यामुळं अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं नाव या जिल्ह्याला देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतला.