बीड: बीडच्या माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणी शरद पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली. 'या घटनेची सखोल चौकशी व्हावी. तसंच कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतोय' असं शरद पवार यांनी जाहीर केलं. तसंच कुटुंबांना धीर देऊ, त्यांना आधार देऊ असंही पवार म्हणाले.
या घटनेने सर्वसामन्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या साखर उद्योगात बीड जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. अशा जिल्ह्यात अशी घटना घडली. काहीच संबंध नसताना सरपंचाची हत्या झाली. ही अत्यंत गंभीर बाब असून राज्य आणि केंद्र सरकारने या घटनेची नोंद घ्यावी, असे शरद पवार हे देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर म्हणाले.
केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्व लोक प्रतिनिधी हे या कुटुंबाच्या मागे आहेत. कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा. बीड जिल्ह्यात ही गोष्ट घडली हे आम्हाला न शोभणारे आहे. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जवाबदारी आम्ही घ्यायला तयार आहेत. आमच्या बारामतीमध्ये ९ हजार मुली शिक्षण घेतात, त्यामध्ये ही एक असेल, असे म्हणत शरद पवारांनी वैभवी देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच, तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या मागे आम्ही सगळे आहोत. गेलेला माणूस परत आणू शकत नाही, पण आपण धीर देवू शकतो, असेही पवारांनी म्हटले.