बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या तसेच पवनचक्की खंडणी, ॲट्रॉसिटी व पवनचक्कीवरील भांडणे या चारही प्रकरणांचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वीच अपहरण आणि खुन आणि ॲट्रॉसिटी हे गुन्हे तपासासाठी सीआयडीकडे सोपविला होते. उर्वरित दोन गुन्हे पोलिस महासंचालकांच्या निर्देशाने वर्ग करण्यात आले. दरम्यान, चार गुन्ह्यांत एकूण नऊ आरोपी आहेत. यातील चौघे कोठडीत असून पाच जण फरार आहेत.
या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहे. सदर घटनेसंदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि संसदेबाहेर आघाडीच्या खासदारांनी आंदोलनही केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार देण्यात आली. तर राज्यात सत्तेतील आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलून धरले आहे. या प्रकरणाचा तपास विशेष यंत्रणेकडे देण्याबाबत सुरुवातीपासून मागणी होती.
त्यानुसार सुरुवातीला सरपंच देशमुख यांचे अपहरण व ॲट्रॉसिटी हे दोन गुन्हे सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) वर्ग करण्यात आले होते. मंगळवारी पवनचक्कीवरील मारहाण व खंडणी हे दोन गुन्हेही पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. संभाजीनगर विभागातील उपाधीक्षक श्री. गुजर तपास करत आहेत.