ठाणे: ठाकरे गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलतांना ‘आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत’ असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची? ते दाखवून दिले असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
ठाकरे गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकार्यांनी रविवारी शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे यांनी हे मत व्यक्त केले. ठाकरे गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकार्यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवी मुंबईतील या प्रमुख पदाधिकार्यांनी उबाठा गटाला सोडचिठ्ठी दिल्याने त्याना हा मोठा धक्का मानला जातो आहे.
दुसरीकडे पालघरमधूनही अनेक पदाधिकार्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेची वाट आहे. साक्री शहरातील तसेच धुळे शहरातील युवासेनेच्या असंख्य पदाधिकार्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकार्यांचे आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.