मुंबई: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, बीडचे खासदार आमदारांनी भेट घेतली. याबाबत आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांची मागणी एकच होती, की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा घ्यावा असे धस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटत राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे धस म्हणाले. त्यांच्याकडे गृह खाते आहे. आम्ही छोट्या माणसांनी त्यांना सांगायची गरज नाही, असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीसह सीआयडी आणि एसआयटी तपास करणार असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक सुद्धा केली आहे. मात्र, या घटनेचा तपास निष्पक्षपाती आणि दबावाविना व्हावा यासाठी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी बीड जिल्ह्यात मोर्चाचे काढून करण्यात आली.
या मोर्चानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी काल राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन दिले. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून संतोष देशमुख यांची हत्या हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे जिल्ह्यात अशांतता पसरली असून सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाची निष्प:क्ष चौकशी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. तसेच या हत्येप्रकरणी अटकेत असलेले वाल्मीक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे केली.