मुंबई: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतांनाच आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला हादरवणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी आळीपाळीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित शाळकरी मुलगी ही १२ वर्षीय आहे. ही मुलगी आपल्या काकांसोबत जोगेश्वरी परिसरात राहते. २४ फेब्रुवारी रोजी ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तिच्या काकांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच पीडित मुलीचा शोध सुरू केला. याच दरम्यान दादर रेल्वे स्थानक परिसरात एक अल्पवयीन मुलगी पोलिसांना भटकत असताना दिसून आली. ही मुलगी प्रचंड घाबरलेली होती. या मुलीची विचारपूस केली असता आपल्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं तिने सांगितलं. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांसोबत संपर्क साधला. जोगेश्वरी पोलिसांत तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंद झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
पीडित मुलीवर प्राथमिक उपचार केल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली. यावेळी पीडित मुलीने घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पीडित मुलगी घरात एकटी होती आणि हेच पाहुन आरोपींनी पीडित मुलीला त्यांच्या जोगेश्वरी येथील घरी नेले. त्या ठिकाणी आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात आढळून आली.
या प्रकरणात पीडित मुलीच्या जबाबानुसार, पोलिसांनी पाच आरोपींच्या विरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायद्याच्य् अतंर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पाचही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. या प्रकरणात आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे सुद्धा अधिक तपास करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पहायला मिळत आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.