मुंबई: स्टँड - अप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबन गीतसंदर्भात दाखल एफआयआर रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना शिंदे गट पक्षाचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल झाला. तसेच या प्रकरणी कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर आता कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर विरोधात कुणाल कामराने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली असल्याती माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कुणाल कामराने दाखल केलेल्या या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे, की ही कारवाई संविधानाच्या अनुच्छेद १९ (१) (अ) (भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार), १९ (१) (जी) (कोणताही व्यवसाय आणि व्यवसाय करण्याचा अधिकार) आणि २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत हमी दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर आता २१ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.