नागपूर: पुण्यानंतर नागपुरात मद्यधुंद कार चालकाचा कारनामा समोर आला आहे. नागपुरातील कोतवाली पोलिस हद्दीतील झेंडा चौक परिसरात शुक्रवारी रात्री भरधाव वेगातील कारनं धडक दिल्यानं लहान मुलासह तीन जण जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावानं कारची तोडफोड केली आहे.
पायी चालणारे महिला, पुरुष आणि ३ महिन्याचा चिमुकला जखमी झाले आहेत. बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील एकाला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तर कारमधील इतर सर्वजण पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारमधील तिन्ही तरुण नशेत होते. ते अमली पदार्थाच्या प्रभावात होते का? यासाठी पोलीस त्यांची वैद्यकीय चाचणी करणार आहेत.
कारमधून दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ जप्त- भरधाव वेगानं कार चालवून अपघात करणाऱ्या चालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरचे डीसीपी गोरख भामरे म्हणाले, " रात्री साडेआठच्या सुमारास एका वेगवान कारने कोतवाली पोलीस स्टेशनच्या झेंडा चौक परिसरात कारनं तिघांना धडक दिली. लोकांनी एका आरोपीला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.