पुणे: सध्या राज्यभर औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारणी आक्रमक झाले आहेत. अनेकांनी ही कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. तर ही कबर काढता येणार नाही, ती ASI अंतर्गत संरक्षित असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. आता राज्यात संभाजी बिग्रेडच्या नावावरुन नवा वाद सुरु झाला आहे.
महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड या नावाने कार्यरत असलेल्या संघटना व पक्षाकडून वारंवार छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. संभाजी ब्रिगेडने नावात बदल करून ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असे करावे किंवा संघटनेचे नाव बदलावे. अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनने दिला आहे. शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत घेत यावरुन मत मांडले आहे.
यावेळी बोलतांना दीपक काटे म्हणाले, की “अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासीयांसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रात मात्र, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून, भेटी घेऊन पाठपुरावा केला आहे. मात्र, संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे व अन्य पदाधिकारी एकीकडे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला कठोर शासन करण्याची, तसेच महाराष्ट्रात राहू न देण्याची भाषा करतात. मात्र, स्वतःच्या संघटनेच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख सर्रासपणे करतात. त्यात बदल करण्याची मागणी केली, तर त्याकडे दुर्लक्ष करतात.” असे मत दीपक काटे यांनी व्यक्त केले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, की “संघटनेने ‘संभाजी ब्रिगेड’च्या नावात ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असे पूर्ण लिहावे. संघटनेने नावात बदल केला नाही, तर त्या संघटनेची व पक्षाची नोंदणी तात्काळ रद्द करावी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी, तसेच अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. शिवभक्त, शंभूभक्तांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ‘संभाजी ब्रिगेड’च्या विरोधात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने येत्या 03 एप्रिल 2025 पासून राज्यभरात आंदोलन छेडले जाणार आहे. पुण्यासह, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल,” असे दीपक काटे यांनी सांगितले. यामुळे आता राज्यात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता संभाजी ब्रिगेडकडून काय उत्तर दिले जाणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.