पुणतांबा: अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे परत हिंदू मंदिरांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणतांबा येथील गोदावरी नदीच्या तीरावर असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची विटंबना काही आज्ञातांकडून डिसेंबर महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत बजरंग बली मंदिराची ही विटंबना करण्यात आली होती. आज दि. १५ मार्च रोजी पुणतांबा येथील अहिल्यादेवी घाट परिसरातील मारुती मंदिरातील श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची काही विकृतांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणतांब्यामध्ये वारंवार हिंदू मंदिरांवर आक्रमणे केली जात आहे. मंदिरांची तोडफोड करून मूर्तींची विटंबना केली जात आहे. दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दक्षिण काशी श्रीक्षेत्र पुणतांबा येथील घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये घडलेल्या संतापजनक प्रकारात मंदिरातील नंदी व महादेवाच्या पिंडीची काही समाजकंटक व्यक्तींनी विटंबना केली होती. त्यावेळी महादेवाचा नंदी तुटला होता. पिंडीवर देखील घाव होते. या घटनेनंतर येथील हिंदू समाज प्रचंड आक्रमक झाला होता आणि पुणतांबा गाव बंद ठेवण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेतील आरोपी मनोरुग्ण असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आरोपी जर मनोरुग्ण आहे तर त्याला फक्त हिंदूंचीचं धार्मिक ठिकाणं, मंदिरे विटंबना करण्यासाठी दिसतात का? असा प्रश्न यावेळी संतप्त सकल हिंदू समाजाने उपस्थित केला होता.
आज झालेल्या या श्री दत्तगुरूंच्या मूर्तीच्या विटंबनेमुळे सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. पुणतांब्यामध्ये वारंवार होणाऱ्या या घटनांच्या पाठीमागे नक्की कोण आहे? याचा लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी यावेळी संतप्त हिंदू समाजाने केली आहे. यामुळे, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पाहायला मिळतं आहे. तसेच, अशा समाजकंटकांविरोधात लवकरात - लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा काही समाजकंटकांचा डाव असल्याचे यातून अधोरेखित असून अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे स्थानिक सकल हिंदू समाजाचे म्हणणे आहे.