छत्रपती संभाजीनगर: भोकरदन तालुक्यातील आन्वा येथूनएका स्टोन क्रशरवर कामालाअसलेल्या तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्य सुमारास ताब्यात घेतले. दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. हुमायून कबीर अलीअहमद, माणिक खान जन्नोदीनखान, इमदाद हुसेन मोहंमद ऊलीअहमद अशी त्यांची नावे आहेत.
अटक केलेले तिघेही बांगलादेशी असून बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यांनी गुप्तपणे कारवाई केली. सुरुवातीला पथकाने या तिघांच्या शोधासाठी जळगाव गाठले होते. नंतर त्यांना हे तिघे भोकरदन तालुक्यात असल्याचे समजले. पारध पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाला मदत केली.
याप्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.भोकरदन तालुक्यातील आन्वा व कुंभारी येथील स्टोन क्रशरवर ते काम करत होते. ते कामानिमित्त कधी आन्वा तर कधी कुंभारी येथे राहत होते. वैध प्रवासी कागदपत्राशिवाय, घुसखोरी करून ते भारतात आले होते.