शिर्डी: शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी साई संस्थानने मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता साई संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवरून विविध सुविधा बुक करून शिर्डीला येणाऱ्या भाविकांना ५ लाख रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. साई संस्थानचा हा निर्णय भाविकांमध्ये समाधानाची भावना निर्माण करणारा ठरतो आहे.
शिर्डीचे साई मंदिर हे देश - विदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे विविध मार्गांनी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांपैकी जे भाविक साईबाबा संस्थानच्या http://online.sai.org.in या अधिकृत वेबसाइटवर दर्शन, भक्त निवास, अभिषेक पूजा, अन्य सेवा बुकिंग करतील त्यांच्यासाठी हा विमा लागू असेल. भक्तांनी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ते घरून शिर्डीला पोहोचेपर्यंतच्या प्रवासादरम्यान अपघात झाल्यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती, गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
साईबाबा संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवरून विविध सुविधा बुक करून शिर्डीला येणाऱ्या तब्बल १० लाख भाविकांना हा विमा मिळणार आहे. यासाठी तब्बल ४८ लाख रुपये संस्थानच्या वतीनं विमा कंपनीला एका वर्षाचे भरण्यात आले आहेत. या अपघाती विमा योजनेच्या अंमलबजावणीला ३० मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. याचा कोणताही भार साईभक्तांवर टाकण्यात येणार नाही. तर विमा हप्ता साईबाबा संस्थानमार्फत भरला जाणार आहे.
साई संस्थानच्या वतीनं भाविकांसाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या विमा योजनेमुळं प्रवासादरम्यान कोणताही अनपेक्षित प्रसंग उद्भवल्यास भक्तांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे.