श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामला भेट देणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १२ पर्यटक जखमी झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचलं आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका महिलेनं फोनवरून सांगितलं, की हल्ल्यात तिच्या पतीच्या डोक्यात गोळी लागली आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करावी, अशी महिलेनं मदतीची याचना केली. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम पर्यटनस्थळावर गोळीबाराचा सुरुवातीला पोलिसांना आवाज ऐकू आला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरूनच प्रवेश करता येतो.
जम्मू - काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाममधील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, घृणास्पद हल्ल्यामागील लोकांना शिक्षा केल्याशिवाय मोकळं सोडणार नाही, याची मी जनतेला खात्री देतो. डीजीपी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोललो. सैन्यदल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकांनी परिसरात धाव घेतली असून शोध मोहीम सुरू केली आहे.