सिंधुदुर्ग: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रात संताप पसरलेला असतांनाच आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणाची विवस्त्र करुन अमानुष हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुडाळ येथे सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर (वय - ३५ वर्षे) या तरुणाचे अपहरण करून, त्याला विवस्त्र करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील रहिवासी प्रकाश यांचे अपहरण करून विवस्त्र करून मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्यात आले. त्यानंतर त्यांना निर्दयपणे लाथा - बुक्क्यांनी तुडवून ठार मारण्यात आले. ही सगळी अमानुष कृती मोबाईलमध्ये शूट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी मृतदेह कुडाळहून सातार्डा येथे नेऊन जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडात आरोपींनी दोन वेगवेगळ्या वाहनांचा वापर करण्यात आला होता. एक वाहन ताब्यात घेतले असून, दुसरे अद्याप सापडलेले नाही. आरोपी सिद्धेश शिरसाटने मोबाईल नातेवाईकाकडे दिला असून त्यात हत्येकांडाशी संबंधित व्हिडिओ असल्याची शक्यता आहे. त्या मोबाईल फोनचा शोध सुरू आहे, असे पोलिस अंमलदार भीमसेन गायकवाड यांनी सांगितले.
या प्रकरणात सिद्धेश शिरसाटसह गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट या चार जणांना निवती पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच सिद्धेश शिरसाट पोपटासारखा बोलायला लागला. यावेळी राक्षसी प्रवृत्तीच्या शिरसाटने बिडवलकरच्या हत्येची कबुलीच दिली आहे.