सिंगापूर: भक्तीपत सेवा फाउंडेशनतर्फे आयोजित विश्वभ्रमण दिंडी अंतर्गत संत तुकाराम महाराज वैकुंठगमन बीज उत्सव सोहळा सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळ सिंगापूर आणि सिद्धपीठ श्री लक्ष्मीनारायण मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातून आलेल्या वारकरी मंडळींनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन बीज सोहळा सिंगापूरमध्ये साजरा केला.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भक्तीपत फाउंडेशनच्या वतीने स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज म्हस्के, शास्त्रीय गायक पंडित रामेश्वरशास्त्री डांगे, भक्तीपत फाउंडेशनचे अध्यक्ष शेषजी महाराज, उपाध्यक्ष दीपक चव्हाण, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील भाविक भक्त सिंगापूरमध्ये दाखल झाले होते. या सर्व साधू-संत व वारकरी मंडळींचे महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या कार्यकारिणी समिती चे अध्यक्ष: सचिन गंजापुरकर उपाध्यक्ष:अजय कुलकर्णी सचिव,अजय पिंपळशेंडे खजिनदार:अजीत वैद्य, जनसंपर्क अधिकारी: किशोर वामन सहसचिव: शितल धरुरकर सहखजिनदार: अमृता कुलकर्णी सदस्य: सचिन जंगम, मृणाल मोडक, नितिन खोले, वर्षाराणी कोळी, मानसी मराठे, अक्षता मोडक वित्तीय लेखा परीक्षक: शुभेन फणसे, अमोल नाबर ,महिला मंडळ उपस्थित होते
आज सकाळी वारकऱ्यांनी सोबत आणलेल्या पादुकांचे दर्शन व्हावे, यासाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूरतर्फे सायली रेस्टॉरंट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे जलाभिषेक, महापूजा, आरती, भजन-कीर्तन व तुकाराम गाथेचे पठण करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनासह महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. या सोहळ्यामुळे सिंगापूरमधील मराठी भक्तांमध्ये अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. संत तुकाराम महाराजांच्या शिकवणींना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भक्तीपत सेवा फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला आहे. विशेष म्हणजे, पेशवाईचे यतीन दातार यांनी या कार्यक्रमात विशेष सेवा अर्पण केली.