Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण गडद झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतला, आणि यामुळे पाकिस्तान समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, पाकिस्तानी तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे, की भारताच्या इशाऱ्याला हलक्यात घेणे पाकिस्तानसाठी अतिशय घातक ठरेल.
पाकिस्तानी तज्ज्ञ उमर फारूख यांनी प्रसार माध्यमातून स्पष्ट केले आहे, की भारताने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. अमेरिकेकडून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची शस्त्रास्त्रे भारताने मागील पाच वर्षांत खरेदी केली आहेत. याशिवाय फ्रान्स आणि इस्रायल यांच्याकडूनही अत्याधुनिक लष्करी उपकरणांची खरेदी सुरु आहे. यामुळे भारताने आपली लष्करी क्षमता प्रचंड वाढवली असून, पाकिस्तानच्या तुलनेत स्पष्ट लष्करी श्रेष्ठता मिळवली आहे.
तसेच, भारतीय लष्करी रणनीतीकार आता केवळ संरक्षणापुरतेच नव्हे तर आक्रमक धोरणासाठीही सज्ज आहेत. त्यामुळे पाकिस्तानने यावेळी भारताच्या इशाऱ्याला दुर्लक्ष करणे आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते, असे फारूख यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, त्यांनी दुसरे महत्त्वाचे कारण असे सांगितले, की आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कमकुवत देशांवर बलाढ्य राष्ट्रांचे आक्रमण हे सहजतेने स्वीकारले जाते. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष याचे जिवंत उदाहरण आहे. आज वॉशिंग्टन, तेल अवीव आणि पॅरिस यांच्याशी भारताचे घनिष्ट संबंध आहेत. ही शहरे केवळ भारताला शस्त्रास्त्रे पुरवत नाहीत तर राजकीय पातळीवरही भारताला जोरदार पाठिंबा देतात. त्यामुळे पाकिस्तानने जर भारताचा इशारा दुर्लक्षित केला, तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सहानुभूती मिळण्याची शक्यता अत्यंत क्षीण आहे.