डोंबिवली: जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी त्यांच्याकडून घडलेला प्रसंग जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगतांना या पीडित कुटूंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असे सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले. यावेळी त्यांना धीर देताना या घटनेतील दोषींवर केंद्र सरकार कठोरात कठोर कारवाई करून तुम्हांला नक्की न्याय मिळवून देईल, असेही सांगितले. यावेळी कल्याण - डोंबिवलीचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. डॉ. बालाजी किणीकर, आ. राजेश मोरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.