भिवंडी: हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुसलमान विरोधी नाही. आज भयप्रद वातावरणामुळे बंगालमधून हिंदू पलायन करत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्येही असे होईल. पुढे मध्यप्रदेशात होईल. एका विशेष समुदायाकडून हिंदूंना घाबरवण्याचे प्रयत्न चालू आहेत, हे निंदनीय आहे. भारतातील मुसलमान हे कायद्यात राहिले, तर फायद्यात रहातील, असे श्री बागेश्वर धाम मठाचे मठाधिपती पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.
देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिला श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीतील हायवे दिवे येथे उभारण्यात आला आहे. या मठाचा लोकार्पण सोहळा १४ एप्रिल या दिवशी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, की ‘‘महाराष्ट्रातील सर्वसाधारण गोरगरीब बागेश्वर बालाजीभक्तांना मध्यप्रदेशात जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांसाठी भिवंडी येथील बागेश्वर बालाजी धाम ही पर्वणी आहे. हा मठ सनातन धर्मप्रसाराचे केंद्र आणि भक्तांसाठी आस्थेचे श्रद्धास्थान होणार आहे.’’