पुणे: ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला कैदी बुधवारी सकाळी पसार झाल्याची घटना घडली आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला कराड पोलिसांनी अटक केली होती. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत. संतोष यशवंत साठे (वय ५२, रा. मासोळी, ता. कराड, जि. पुणे) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. साठे हा ग्रामसेवक होता. त्याच्याविरुद्ध कराड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
साठे याची एका महिलेशी समाज माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तो पुन्हा महिलेला भेटण्यासठी गेला होता. त्यानंतर साठे याच्याविरुद्ध पुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.
छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असता त्याानंतर कराड पोलिसांनी त्याला बुधवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्याबरोबर दोन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. बंदोबस्तास असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून साठे रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर या घटनेची माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या निगराणीतून पसार झाल्याप्रकरणी साठेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी बंडगार्डन आणि कराड पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.