पुणे: पुण्यामध्ये मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या अझहर उर्फ बडे सय्यद याला फरासखाना पोलिसांनी गणेश पेठ परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख ८८ हजारांचे २९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. अझहर उर्फ बडे सय्यद (रा. नाडे गल्ली, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ तस्कर, तसेच विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
गणेश पेठेतील नाडे गल्लीत सोमवारी दि. २५ मार्च रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास सय्यद मेफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश राठोड आणि समीर माळवदकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ५ लाख ८८ हजारांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सय्यद याने मेफेड्रोन कोणाकडून आणले? तसेच कोणाला विक्री करणार होता? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.