बीड: राज्यातील विविध भागांत सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सध्या बीड जिल्हा चर्चेत आहे. कारण गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व दहशत चर्चेचा विषय बनला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली.
याप्रकरणी बीडच्या एसपींची बदली करण्यात आली. त्यानंतर नवनीत कावत यांची बीड जिल्ह्याच्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची त्यांच्यावर मोठी जबाबादारी देण्यात आली. त्यादृष्टीने नवनीत कावत यांनी गेल्या काही दिवसांत पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल केले आहे. त्यानुसार, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ‘संवाद प्रकल्प’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या ‘संवाद प्रकल्प’ या उपक्रमांर्गत नागरिकांना पोलिसांशी सहज संवाद साधता यावा म्हणून त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सोय करण्यात आली आहे. क्यू. आर. कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील माहिती सामान्य लोकांना मिळणार असून तक्रारही करता येणार आहे. यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. हा क्यूआर कोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे कक्षात व पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षात लावण्यात येणार असून मोबाईलद्वारे सदरचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर माहिती भरता येईल.
विशेष म्हणजे पोलिसांच्या कामगिरीचे गुणांकन देखील याच फॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे. एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यास त्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून २४ तासांच्या आत समस्या जाणून घेवून समाधान करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. हा क्यूआर कोड हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहिती द्यायची असेल तर ते हा क्यूआर कोड स्कॅन करुन माहिती देऊ शकतात. अशा व्यक्तींचे नाव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाणार आहे.
तसेच, याद्वारे नागरिकांना त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या क्यूआर कोडद्वारे ते देऊ शकतात. शिवाय, नागरिकांनी केलेल्या तक्रारी, दिलेल्या प्रतिक्रीया, सूचना ह्या पोलीस अधीक्षक स्वतः पाहू शकणार आहेत. तसेच नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जाणार आहे.