मुंबई: मुंबई येथील आगामी विमानतळाच्या शेजारी पूर्वी असलेल्या फुल पीर शाह बाबा दर्ग्याच्या ठिकाणी उरुसाला अनुमती मिळू शकणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पनवेलच्या जवळ असलेल्या सिडकोच्या जागेवर होऊ घातलेल्या विमानतळाच्या शेजारी बांधलेला फुल पीर शाह बाबा दर्गा नोव्हेंबर २०२४ मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर सिडकोने तिथे कुंपण घातले. या संदर्भातील लढा अनेक दिवस चालू होता.
दर्ग्यावर कारवाई झाल्याची माहिती सिडकोकडून प्राधिकरणाला प्रतिज्ञापत्रावर देण्यात आली होती. दर्गा पाडलेल्या जागेवर ‘येथे उरुस साजरा करण्यासाठी अनुमती द्यावी’, असा अर्ज स्थानिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ प्राधिकरणाकडे केल्यावर तेथील प्राधिकरणाने त्याला परस्पर अनुमती दिली. त्याविरोधात सिडकोने याचिका केली. या याचिकवर वरील निकाल न्यायालयाने दिला. याची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी या दिवशी आहे.
‘दर्गा तोडला असतांना तेथे उरुसासाठी अनुमती देणे योग्य ठरणार नाही’, असे नमूद करत उच्च न्यायालयाने वक्फ बोर्ड प्राधिकरणाचे आदेश स्थगित केले. न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ‘दर्गा नसलेल्या ठिकाणी उरुसाला अनुमती देताच येणार नाही’, असा दावा सिडकोकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला. या वेळी न्यायालय म्हणाले, ‘‘हा दर्गा तोडण्यात आला असतांना उरुससाठी का अनुमती देण्यात आली ?, हा प्रश्न आहे.’’