दिल्ली: महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त होणे हे माझे सौभाग्य असल्याचे मी समजतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिल्ली येथे केले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये रोख, सन्मानचिन्ह व शिंदे शाही पगडी असे आहे. पुरस्काराची राशी आणि स्वतःकडून पाच लाख रुपये सरहद संस्थेला देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरून जाहीर केले.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की महादजी शिंदे यांचे कर्तुत्व रणांगणावर जेवढे प्रखर होते तेवढेच ते कवी, अभंगकार म्हणूनही सुप्रसिद्ध होते. ग्वालेर येथील धृपद घराणे आणि खयाल गायकी घराण्याची कितीतरी गीते त्यांनी लिहिलेली आहेत. या त्यांच्या कार्याचा उल्लेख श्री. शिंदे यांनी केला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमात पराक्रमी महादजी शिंदे यांचा इतिहास असावा यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना, भाऊंना आणि महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करीत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आपण आतापर्यंत काम करीत आहोत. आज मिळालेला हा पुरस्कार कामाची पोचपावती असल्याचे श्री. शिंदे यावेळी म्हणाले.