पुणे: विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लाखो विद्यार्थी आपल्या भविष्याची स्वप्न घेऊन पाऊल ठेवतात. येथील अनेक संस्था या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात, त्यांच्या आयुष्याला दिशा देतात, कलाटणी देतात. मात्र, सध्या पुण्यातील हे नामवंत विद्यापीठ वेगळ्याचं कारणाने चर्चेत आहे. येथील वस्तीगृह क्र. ६ मध्ये २ विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे आढळून आली आहे. या विद्यार्थ्यांच्या साहित्याची चक्क उंदरांकडून नासधूस झालेली आहे. त्यामुळे, विद्यापीठाच्या वस्तीगृहात उंदरांचा सुळसुळाट सध्या पुणे विद्यापीठ आणि पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
वस्तीगृहातील विद्यार्थ्यांकडून गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुख्य वस्तीगृह प्रमुखांना याबाबत तक्रार सुध्दा दिलेली होती. तरीसुद्धा या विषयात विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतलेली नाही. या सर्व गोष्टीवरून वस्तीगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हिंदी विभागाचे आणि अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मुख्य वस्तीगृह प्रमुखांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी एकदाही या विषयाची दखल घेतली गेली नाही, असा देखील आरोप आता विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.