अहिल्यानगर: स्वस्त धान्य दुकानांमार्फत फेब्रुवारी महिन्यात रेशनवर ज्वारीचे वाटप करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील ३ हजार २८८ मेट्रिक टन ज्वारीचे वाटप केले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना ८ किलो गहू आणि ८ किलो ज्वारी दिली जाणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेचे रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी दिली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये गहू १५ किलो, तर तांदूळ २० किलो दिला जातो. त्याचबरोबर एक किलो साखर दिली जाते. जिल्ह्यात ८७ हजार ९५० अंत्योदयचे शिधा पत्रिकाधारक आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला पाच किलो धान्य दिले जाते. गहू २ किलो तर तांदूळ ३ किलो दिले जात आहेत. जिल्ह्यात ६ लाख २४ हजार ५३५ शिधापत्रिका धारक आहेत.