महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून धक्कादायक घटना घडत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील मलोनी भागात आईला शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका २३ वर्षीय आदिवासी तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिसांत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन न्यायालयाने दोघा आरोपींना ६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. तरुणीच्या मृत्युनंतर जिल्ह्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मलोणी भागात दिपाली सागर चित्ते व रिज्जु मुस्लीम कुरेशी यांच्यात किरकोळ वाद होऊन शिवीगाळ झाली याचा जाब विचारण्यासाठी दिपाली व तिचे नातेवाईक गेले असतांना तेथे रिज्जूचे पती मुस्लिम हमीद कुरेशी याने रागाच्या भरात दिपालीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर दिपालीला उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती बिघडल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी ३ जानेवारी रोजी तिला सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिपालीचा ५ जानेवारीला दुपारच्या सुमारास मृत्यू झाला.
याबाबत शहादा पोलिसांत दिपाली चित्ते हिच्या फिर्यादीवरून प्रथम भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम- 118(1),352,3 (5) प्रमाणे मुस्लीम हमीद कुरेशी, रिज्जु मुस्लीम कुरेशी, विधी संघर्ष बालिका सर्व. रा. अक्सा पार्क समोर मलोणी ता. शहादा यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला होता. मात्र दिपालीला सुरत येथे हलविण्यात आल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात वाढीव कलम दाखल करत हत्येचा प्रयत्न करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयात जामीन रद्द करण्याचा अर्ज चार जानेवारीला दाखल करण्यात आला होता. यावर ५ जानेवारीला न्यायालयाने दोन्ही आरोपीचा जामीन रद्द करून त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर या विरोधात विविध संघटनांतर्फे मलोणी येथे ४ जानेवारीला आंदोलन करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलन कर्त्यांची समजुत घातल्यानंतर शांतता निर्माण झाली. मात्र काल रविवारी दुपारी जखमी दिपालीचा मृत्यु झाल्याने विविध संघटनांचे आंदोलनकर्ते रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जमले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती.
दिपाली चित्ते हिच्या मृत्यूमुळे शहादा तालुक्यातील आक्रमक आदिवासी समाजाने शहर बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासून शहादा शहरात व्यापाऱ्यांची सर्व दुकाने बंद केली आहेत. या प्रकरणी शहादा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. शहादा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहादा तालुक्यातील आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.