नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फटकारले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही त्यांच्याबाबत असे वागत आहात! भविष्यात कधीही अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नका, अन्यथा न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी माफीवीर अशी टिप्पणी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य सैनिकांची चेष्टा करू नका, असे सुनावतांनाच खंडपीठाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारले, की महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधतांना स्वतःसाठी तुमचा विश्वासू सेवक या शब्दांचा वापर केला होता, हे राहुल गांधी यांना माहीत आहे का? राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेले विधान बेजबाबदार होते. त्यांनी हे बोलायला नको होते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.