अमरावती: अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. अमरावतीमध्ये एका ६५ वर्षीय नराधमाने तीन वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनवलं आहे. आरोपीनं पीडित मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रकाश पुंडकर असं नराधम आरोपीचं नाव आहे. तो पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. घटनेच्या दिवशी बुधवारी तीन वर्षीय पीडित मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. यावेळी आरोपी पुंडकर त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचं आमिष दाखवलं. चॉकलेट मिळेल या आशेनं पीडित मुलगीही आरोपीसोबत गेली. आपल्याला कुणी पाहत नसल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीने पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपी प्रकाश पुंडकर याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या नातीच्या वयाच्या चिमुकलीवर ६५ वर्षांच्या वयोवृद्धाने अत्याचार केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय. या घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करत आहेत.