वलसाड: ‘धर्म सर्वांना आनंदाकडे घेऊन जाऊ शकतो, आपण लोभ किंवा भीतीमुळे धर्म बदलू नये. दैनंदिन जीवनात लोभ आणि प्रलोभनाचा सामना करावा लागू शकतो आणि या गोष्टी लोकांना त्यांच्या धर्मापासून दूर नेऊ शकतात, परंतु केवळ धर्मचं सर्वांना आनंदाकडे घेऊन जाऊ शकतो.' असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी गुजरात मधील वलसाड जिल्ह्यातील श्री भव भावेश्वर महादेव मंदिराच्या रौप्यमहोत्सवी समारंभाला उपस्थिती लावली त्यावेळी केले. येथे त्यांनी देशात सुरू असलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावर चर्चा केली.
यावेळी बोलतांना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, की लोभ किंवा भीतीच्या प्रभावाखाली लोकांनी कोणत्याही परिस्थितीत आपला धर्म बदलू नये. आम्हांला संघटित कसे व्हायचे? हे माहित आहे आणि आम्ही संघटित राहू इच्छितो. आपल्याला लढायचे नाही, पण आपल्याला स्वतःचे रक्षण करावे लागेल, कारण आजही अशा शक्ती आहेत ज्या आपल्याला बदलू इच्छितात (धर्मांतरित करू इच्छितात).
पुढे भागवत म्हणाले, की ‘महाभारताच्या वेळी धर्म बदलणारा कोणीही नव्हता, परंतु पांडवांचे राज्य बळकावण्याच्या लोभात दुर्योधनाने जे केले, ते अनीतिमान होते. धार्मिक प्रथा नियमितपणे केल्या पाहिजेत. आपण आसक्ती आणि मोहाच्या प्रभावाखाली काम करू नये, किंवा स्वार्थात अडकू नये. असे होऊ नये की लोभ किंवा भीती आपल्याला आपल्या श्रद्धेपासून दूर नेईल. म्हणूनच येथे अशी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.’