गडचिरोली: राज्यातील प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी परिवहन विभागाची एसटी बस आपल्याला मदत करत असते. स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनी काल गडचिरोलीमधील १५ गावांना बससेवा मिळाली आहे. गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या १५ गावांमध्ये बससेवा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडा पर्यंतच बस प्रवास करणे शक्य होते. कारण, यापुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुलच नव्हते. या भागात माओवाद्यांचे राज्य चालत होते, दोन वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला प्रभाव वाढवणे सुरू केले.
त्यानंतर एकानंतर एक पोलीस मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही हिम्मत करत गट्टा ते वांगेतुरी दरम्यान ३२ किलोमीटरचा रस्ता निर्माण केला. विशेष म्हणजे शासन व प्रशासकीय पातळीवर झालेल्या या कामामुळे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर या मार्गावर एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे