मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा राखणारे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे मा. आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. राजन साळवी यांनी बुधवारी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवी आज गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. साळवी यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे लांजा - राजापूर विधानसभा मतदार संघात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेत अभूतपूर्व बंड केल्यानंतर जे काही मोजके आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यापैकी राजन साळवी एक होते. उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यामुळे साळवी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागले होते. तरीही साळवी यांनी ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाला कोकणात आणखी बळ मिळणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे उदय सामंत, किरण सामंत, योगेश कदम असे तीन आमदार आहेत. पक्षात फूट पडण्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार होते. फुटीनंतर राजन साळवी, वैभव नाईक आणि भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. आता साळवींनी ठाकरे गटाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंकडे रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधव यांच्या रूपाने एकमेव नेतृत्व राहिले आहे.