मालेगाव: मालेगावमध्ये अखेर हिंदू शक्तीचा विजय झाला आहे. मालेगाव शहरात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणाऱ्या हिंदू संत संमेलनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली असून, संपूर्ण शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सकल हिंदू समाज व विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन यंदा दिमाखात साजरे होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारली जात होती. त्यामुळे आयोजकांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देत संत संमेलनाला हिरवा कंदील दाखवला. प्रशासनाच्या अडथळ्यांवर मात करत न्यायालयाच्या आदेशामुळे संपूर्ण हिंदू समाजात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी मालेगाव शहरात विराट हिंदू संत संमेलन संपन्न होणार असून, यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा ‘हिंदूवीर’ पुरस्काराने सन्मान. याशिवाय विविध संत, महंत, धर्माचार्य आणि हिंदू धर्मप्रेमी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार आहेत.
कोरोनानंतर अनेक वर्षांनी पारंपरिक पद्धतीने हे संत संमेलन मोठ्या उत्साहात आयोजित होणार आहे. मालेगाव शहर सज्ज झाले असून, संपूर्ण शहरात हिंदुत्वाचा गजर आणि धर्मप्रेमींचा महासंगम होणार आहे. ‘जय जय धर्मवीर’, ‘जय जय हिंदू धर्म’च्या घोषणांनी मालेगाव शहर निनादणार हे निश्चित.