मराठा आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. सातव्या दिवशीही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी मागणी सरकारकडून केली जात आहे. या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असा सल्ला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. शिवशक्ती परिक्रमेच्यानिमित्ताने त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
“गेले दोन दशक, मुंडे, भुजबळ, वडट्टीवार, नाना पटोले यांनी ओबीसी भूमिका मांडत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही. हा विषय संवैधानिक आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“कोणताही राजकारणी एक मिशन घेऊन समाजातील सर्व लोकांना दिलेला शब्द पाळणारा असतो. मराठा समाजाची उद्विग्नता पाहून मला त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करावसं वाटतं. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या परिस्थितीकडे फार चिंतेने पाहते. मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे. जालन्यात जे घडलं त्याबाबत मी दुःख व्यक्त केलं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.