मुंबई: अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांतील सागरी क्षेत्रात खनिज तेलाच्या नव्या साठ्यांचा शोध लागला आहे. खनिज तेलाच्या या नवीन साठ्यांमुळे भारत तेलाचे उत्पादन करण्यास सक्षम असेल अशी आशा निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात तर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सागरी क्षेत्राात सुमारे १८ हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापलेल्या नवीन तेलाचे साठे सापडले आहेत. केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच त्या भागात संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. हे संशोधन अरबी समुद्रात ८ वर्षांपासून सुरू आहे.
महाराष्ट्राच्या तळ कोकणाजवळील अरबी समुद्रात हे नवे तेलसाठे सापडले आहेत. अरबी समुद्रात तेल साठ्यांसाठी ८ वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. पालघरमधील डहाणूजवळ ५ हजार ३३८ आणि सिंधुदुर्गजवळील मालवणजवळ १३ हजार १३१ चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. डहाणू आणि मालवण येथे तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल.
आधीच्या दोन तेल साठ्यांच्या तुलनेत सध्या सापडलेला तेल साठा मोठा असल्यामुळे तेल उत्पादन चार पटीने वाढणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी झळाळी मिळणार असून यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळण्यासह रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.