मुंबई: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील रेल्वे हद्दीत अनधिकृत बांधकाम करून उभारलेल्या घरांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला झोपडपट्टी धारकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान झोपडपट्टीधारकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ५ पोलीस आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या तोडक कारवाई दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी २० ते २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, अनेकांवर गुन्हा दाखल केला जात आहे.
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेतील सुभाष रोड येथे रेल्वे लगत राहत असलेल्या झोपडपट्टीधारकांनी बिराड मोर्चा काढला. आज बुधवारी दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास झोपडपट्टी धारकांनी लोकांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या मुलभूत हक्कांसाठी हा मोर्चा काढला होता. या मोर्च्यात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, आणि लहान मुलांनी सहभाग घेतला होता.
मात्र, या मोर्च्याच्यावेळी आंदोलनकांनी दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. या आंदोलकांना जोगेश्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या गुन्हा दाखल केला जात आहे.