नवी मुंबई: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळतंय. त्यातच तुर्भे, नेरूळ खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी मुंबई परिसरात विशेषतः गावठाणांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बांगलादेशी राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगानं या बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी जवळपास १६ पथकं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून तैनात करण्यात आली.
पहाटे साडेतीन पासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतील पेंढरगाव, तळोजा, खारघर, करावे, सीवूड्स, नेरूळ गाव, सारसोळे गाव, वाशी गाव इंदिरानगर, केके आर रोड, तुर्भे एमआयडीसी, कामोठे, कळंबोली स्टील मार्केट परिसरातील झोपडपट्टी परिसरात एकाच वेळी कारवाई करण्यात आली. यावेळी २६५ संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण सात बांगलादेशी गेल्या पाच ते वीस वर्षांपासून नवी मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीत राहत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यांनी बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखले बनवल्याचे देखील लक्षात आलं आहे.
तुर्भे परिसरात चार अवैध बांगलादेशी आणि त्यांना आश्रय देणारे दोन भारतीय नागरिक यांच्यावर गुन्हे शाखेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलीय. त्याचबरोबर नेरूळ आणि खांदेश्वर पोलिसांच्या हद्दीत देखील दोन अनधिकृत बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध बांगलादेशींना घर भाड्यानं दिल्यास किंवा त्यांना कामावर ठेवल्यास संबंधित घरमालक, बांधकाम व्यावसायिक आणि अवैध बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या इतर व्यक्तींवर परकीय नागरिक कायदा कलम १४ (क) तसंच रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेन ऍक्ट अन्वये अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.