Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. या प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान त्यांनी या प्रकरणात सूरज पांचोली, आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यावर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की ’दिशा सालियनच्या वडिलांनी काही आरोप करो. हत्या प्रकरणानंतर त्यांच्या घरी गेली होती. मी उघड उघड घरी गेली होती. त्यावेळी माध्यमे देखील होती. तिच्या पालकांसोबत उघड - उघड चर्चा केली. त्यांची बायको वेगवेगळ्या चटण्या बनवते. यावरून त्यांच्यासोबत चर्चा केली. आमचा दुरान्वये संबंध नाही. आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत. एक आरोप केला. तो मागे पडला. त्यानंतर आता दुसरा. तिचे वडील आले होते. हे उघड उघड आहे. दिशा सालियनचे वडील महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. मला वाटतं, त्यांनी लेखी दिलं होतं. त्यांचे अनेकदा फोन आले होते', अशा त्या पुढे म्हणाल्या.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी एका वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी, “एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून खाली पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला आहे.
“माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता”, असं ही त्यांंनी म्हटलं आहे.