पुणे: पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्रांसोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (०३ ऑक्टोबर) रात्री घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात फिरायला गेलेल्या पीडिता आणि तिच्या मित्राजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले.
त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर पीडित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे पीडितेवर तिघांनी बलात्कार केला, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी 10 पथके नेमली आहेत.