पुणे: पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात १९ मे २०२४ रोजी हिट अँड रनची घटना घडली होती. त्यात दारुच्या नशेत पोर्शे कार चालवणाऱ्या एका बिल्डरपुत्राने दोन तरुण अभियंत्यांना उडवले होते. त्यात दोघांचाही बळी गेला होता. त्यानंतर बाल न्याय मंडळाने या आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश देऊन त्याला तत्काळ जामीन मंजूर केला होता. त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानतंर महिला व बाल विकास आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार सरकारने बाल न्याय मंडळाच्या एल. एन. धनवडे व कविता थोरात या दोन सदस्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.
अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने साडेत सात हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करुन सोडलं होतं. तसंच, तीनशे शब्दांचा निबंध आणि आरटीओत जावून वाहतूक नियमांचा अभ्यास करावा, अशा अटी घालण्यात आल्या होत्या. दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला इतकी सौम्य शिक्षा सुनावल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. हे प्रकरणही तापलं होतं. पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या या दोन राज्य नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.