कोथरूड: कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या घटनेमुळे चंद्रकांत पाटील भडकले असून, त्यांनी अशा विकृतींना चाप बसविण्याचे निर्देश पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, झाडांच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांसंदर्भात १३ जानेवारी रोजी वन विभागाच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील म्हातोबा, पाषाण, महात्मा टेकडीवर औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्षांची लागवड केली. गेल्या आठवड्यात तीन वेळा म्हातोबा टेकडीवर येणाऱ्या काही टवाळखोरांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर काल चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करुन आढावा घेतला. यावेळी वन विभागाचे अधिकारी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले, सहाय्यक उप वन संरक्षक दिपक पवार उपस्थित होते.
झाडांच्या सुरक्षेसाठी टेहळणी बुरुज उभारणे, रात्रीच्या सुमारास अशा घटना टाळण्यासाठी म्हातोबा मंदिर परिसरात सौर ऊर्जेद्वारे पथदिवे कार्यान्वित करणे, झाडांची निगा राखण्यासह वाळलेले तण काढण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, पर्यावरण संवर्धनासाठी कॅम्प उपक्रम राबविणे, टेकडींवर गुरांना चराईवर नियंत्रण आणणे, यांसह दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात संपूर्ण भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढविणे आदी सूचना करण्यात आल्या.
या पाहाणी वेळी मुख्य वन संरक्षक मनोज बारबोले यांनी घटनेची माहिती चंद्रकांत पाटील यांना दिली. त्यावर घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केली. त्यावर मनुष्यबळ अभावामुळे अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात मर्यादा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यासमोर स्पष्ट केले. त्यावर लोकसहभागातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.