सिंधुदुर्ग: कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीत कोकणात उद्धवसेनेचं अक्षरश: पानीपत झालं. पक्षाला कोकणात केवळ १ जागा निवडून आणता आली. त्यानंतर आता पक्षाला कोकणात गळती लागली आहे. मा. आमदार राजन साळवींनी काल बुधवारी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. आज ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षानंही ठाकरेंना धक्का दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख व शिरगांव येथील असंख्य शिवसैनिकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलं आहे. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
या प्रवेशानंतर बोलतांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी ही फक्त सुरवात असल्याचे सांगत नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे. उबाठा नावाचा गट आतां संपलेला आहे. बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा विकास केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेत बसलाय त्यामुळे चांगले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र आम्ही चांगल्यातले चांगले कार्यकर्ते घेतो घाण घेत नाही. येणाऱ्या काळात भाजपा पक्ष कोकणात एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाण्यापाठोपाठ शिवसेना कोकणात विस्तारली. चाकरमान्यांमुळे सेनेचा कोकणात विस्तारला आणि कोकण शिवसेनेचा अनेक दशकं बालेकिल्ला राहिला. पण आता या किल्ल्याला एकनाथ शिंदे आणि भाजपनं पद्धतशीर सुरुंग लावला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कोकणातले बहुतांश आमदार शिंदेंसोबत गेले. त्यामुळे कोकणातील ठाकरेसेना खिळखिळी झाली आहे.