डोंबिवली: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या रयतेच्या राज्याला डंख लावण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला. छत्रपती संभाजी महाराजांची त्याने अतिशय क्रूरतेने हत्या केली. त्यामुळे औरंगजेबाचे गोडवे गाणारे, त्याचे समर्थन करणारे हे देशद्रोहीच आहेत, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून डोंबिवलीत एमआयडीसीत घारडा सर्कल येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. या चौकाचे नामकरण कल्याण डोंबिवली पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाचा इतिहास सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा एकतरी गुण घेतला पाहिजे. त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. ही महाराजांना खरी श्रध्दांजली ठरेल असे सांगितले. शिवाजी महाराज म्हणजे धैर्य, समर्पण, त्याग, निती, दूरदृष्टी, युगपुरूष, प्रवर्तक अशा अनेक सदगुणांचा एक तेजोगोल होता. या गुणांमुळे ते रयतेचा राजा म्हणून गौरवले गेले. डोंबिवलीच्या प्रवेशव्दारावरील हा पुतळा तरूण पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देईल. त्यांना प्रेरणा देईल. शिवभक्तांना उर्जा देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.