कारंजा: वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान होत असल्याच्या माहितीवरून आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे वाशिम, कारंजा आणि अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने रुग्णालयावर रात्री छापा टाकला. या छाप्यात रुग्णालयात ५ गर्भवती महिला गर्भलिंग निदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले. या महिलांपैकी २ महिला बुलढाणा जिल्ह्यातील, २ अकोला जिल्ह्यातील आणि १ महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील होती.
आरोग्य विभागाला लिंग निदान होत असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर, ६ सदस्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून रुग्णालयात पाठवले.तिथे तिची भेट एका एजंटशी झाली, ज्याने तिला लिंग निदानाची हमी देत २०,००० रुपयांची मागणी केली. त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनंतर आरोग्य विभागाने तत्काळ छापेमारी केली. छाप्यादरम्यान, पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली आणि एजंटकडून ६०,००० रुपये रोख रक्कम तसेच ५ मोबाईल जप्त केले. या कारवाईत आरोग्य विभागाने लिंग निवड प्रतिबंधक कायद्याच्या उल्लंघनावर ठोस पाऊल उचलत गंभीर कारवाई केली.
आरोग्य विभागाच्या मते, गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर प्रकारामुळे महिलांच्या जन्मदरावर आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे कारंजा शहरात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.