मुंबई: आम्हांला येथे औरंगजेब, टिपू सुलतान यांच्या विचारांची घाण नको आहे. ती पाकिस्तानमध्ये घेऊन जावी. महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याचे विचार हवे आहेत. मी हिंदू समाजाला विश्वास देतो, की औरंगजेबाच्या कबरीचाही करेक्ट कार्यक्रम अवश्य होईल, असे विधान मत्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, की ‘‘सरकारकडे ५ वर्षे आहेत. आता तर आम्ही मैदानात उतरलो आहोत. शतक पूर्ण करायचे आहे. औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असे मी ऐकले आहे. जितकी सुरक्षा वाढवली जाईल, तितका त्या कबरीचा कार्यक्रम करण्यात मजा येईल. ‘औरंगजेबाची कबर कधी तोडणार ? याविषयी पत्रकार मित्र विचारतात; परंतु हे काय बाळाचे नाव ठेवण्यासाठी बोलवायाला ‘बारसे’ नाही. आधी काम करणार आणि मग सांगणार. जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवरील अतिक्रमण हटवले, तेव्हा पत्रकारांना कॅमेरे घेऊन यायला सांगितले नव्हते. आधी अतिक्रमण हटवले, मग वृत्त दिले. त्यामुळे हा कार्यक्रमही ठरल्याप्रमाणे होईल.’’