सांगली: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त धर्मवीर बलीदान मास पाळला म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश स्कूलमधील शिकणार्या २ विद्यार्थ्यांना अपशब्द बोलून वर्गातून बाहेर काढल्याचा व भर उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर विद्यार्थांना अपमानास्पद बोलून शाळेतून हाकलून दिले. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी या प्रकरणी संजयनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार करून शाळेतील शिक्षक आणि संचालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संजयनगर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन धारकर्यांना दिले आहे. तसेच धारकर्यांनी या प्रकरणाचा निषेध केल्यानंतर शाळेतील संचालक आणि शिक्षक यांनी वरील दोन्ही विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश दिला आहे.