शिर्डी: शिर्डी येथील साईबाबा संस्थान अन्नछत्रामध्ये मिळणार्या भोजनासाठी भाविकांना आता कूपन घेणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी शिर्डीत विनामूल्य भोजनासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता; मात्र आता केवळ कूपन असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिर्डीत काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटनाही घडली होती. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने वरील निर्णय घेतला. नुकतीच पत्रकार परिषद घेऊन साईबाबा संस्थानकडून ही भूमिका घोषित करण्यात आली आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांंगितले, की साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी विनामूल्य भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक आणि संस्थानच्या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण यांच्यासाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागतील. ६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची कार्यवाही चालू होईल. काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याने, तसेच भोजनानंतर परिसरात धूम्रपान करत असल्याने साईभक्तांना त्रास होतो. अशा अनेक तक्रारींमुळे हा पालट करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन विनामूल्य भोजन व्यवस्था अशी असेल...
१. दर्शन घेतलेल्या भाविकांना उदी - प्रसाद कक्षाजवळ कूपन दिले जाईल.
२. मुखदर्शन घेतलेल्या भाविकांसाठी मुखदर्शन सभागृहात ऐच्छिक कूपन दिले जाईल.
३. संस्थान निवासस्थानातील भाविकांना त्यांच्या खोलीच्या पावती आणि चावी यांच्या आधारे भोजनकक्षात प्रवेश मिळेल.
४. रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी केसपेपर किंवा भरती कार्ड दाखवून भोजन मिळेल.
५. पालखी पदयात्रा करणारे आणि शालेय सहलींसाठी आलेले यांच्याविषयी संस्थान अधीक्षकाच्या निश्चितीनंतर प्रवेश दिला जाईल.
६. सशुल्क भोजन सुविधा पूर्वीप्रमाणेच चालू राहील. सकाळच्या वेळी दर्शनरांगेत अल्पाहारसाठी वेगळे कूपन दिले जाईल. त्यासाठी पैसे भरावे लागतील.